(शिमला / वृत्तसंस्था)
हवामान बदल आणि पर्यावरणातील गंभीर बदलांचे परिणाम भारतीय मध्य हिमालयातही दिसून येत असल्याचे एका वैज्ञानिक अभ्यासातून समोर आले आहे. ‘डिस्कव्हर जिओसायन्स’ या नियतकालिकात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, भारतीय मध्य हिमालयातील हिमनद्या वेगाने मागे सरकत आहेत. या निष्कर्षामुळे शास्त्रज्ञ आणि पर्यावरणप्रेमींची चिंता वाढली असून, हिमालयाच्या अस्तित्वासमोरील नव्या संकटाकडे जगभरातील संशोधकांचे लक्ष वेधले गेले आहे.
डेहराडून येथील यूपीईएस आणि वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीच्या संशोधकांनी संयुक्तपणे हा अभ्यास केला आहे. यासाठी १९९० ते २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेली संशोधने, क्षेत्रीय सर्वेक्षण, उपग्रह प्रतिमा, डीईएम तसेच उपलब्ध इतर अभ्यासांची तुलना करण्यात आली. या आढाव्यात २३ प्रमुख हिमनद्यांमध्ये एकूण २५,६२१.०१ मीटरची घट झाल्याचे आढळले. अभ्यासाच्या एका भागात हिमनद्यांच्या मागे हटण्याचा सरासरी दर २३.२३ मीटर प्रति वर्ष नोंदवण्यात आला आहे. मात्र, नंतरच्या सारांश तक्त्यात अंकगणितीय सरासरी २४.६३ मीटर प्रति वर्ष नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे अहवालातील या सरासरीच्या आकडेवारीत विसंगती असल्याचे दिसून येते.
टिहरी गढवालमधील खाटलिंग हिमनदीचा वेगाने मागे सरकणाऱ्या हिमनद्यांमध्ये समावेश आहे. १९६५ ते २०१४ या कालावधीत तिचा सरासरी वार्षिक मागे हटण्याचा दर ८८ मीटर होता. याच कालावधीत ही हिमनदी सुमारे ४.३४ किलोमीटर मागे सरकली असून, त्यामुळे तिचे लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजन झाले आहे. मध्य हिमालयातील हिमनद्यांच्या मागे हटण्याचा वेग किती मोठा आहे, हे विविध वैज्ञानिक अभ्यासांमधील आकडेवारीतूनही स्पष्ट होते. २००० ते २०१८ या कालावधीत पिंडारी हिमनदी दरवर्षी ४५.८ मीटर वेगाने मागे सरकली, तर मिलम हिमनदी १९७२ ते २०१८ या कालावधीत दरवर्षी सरासरी ३७.८ मीटरने वितळली.
गंगोत्री हिमनदीच्या मागे हटण्याचा दर १९३५ ते २००४ या काळात दरवर्षी सुमारे २२ मीटर राहिला आहे. चोराबाडी हिमनदी दरवर्षी ६.८ मीटर, तर भागीरथी हिमनदी प्रतिवर्ष ३.७ मीटर वेगाने आक्रसत असल्याचेही अभ्यासातून समोर आले आहे. सतोपंथ हिमनदीबाबत विविध संशोधनांमध्ये वेगवेगळे निष्कर्ष नोंदवले गेले आहेत. मात्र, या अहवालातील संदर्भानुसार १९६२ ते २०२० या प्रदीर्घ कालावधीत तिचा वितळण्याचा सरासरी वार्षिक दर ६.५ मीटर होता.
हिमनद्यांच्या मागे हटण्यामागे केवळ तापमान हा एकमेव घटक नसल्याचे या अभ्यासातून स्पष्ट करण्यात आले आहे. सुप्राग्लेशियल डेब्रिस म्हणजेच हिमनदीच्या पृष्ठभागावर जमा होणारा खडकाळ कचरा अनेक हिमनद्यांमध्ये इन्सुलेशनचे काम करतो. त्यामुळे पृष्ठभागावरील वितळण्याची प्रक्रिया मंदावू शकते. परिणामी, कचऱ्याने झाकलेल्या हिमनद्या स्वच्छ बर्फ असलेल्या हिमनद्यांच्या तुलनेत समोरच्या भागातून तुलनेने हळू मागे हटतात. याशिवाय हिमनदीची उंची, उतार, आकार आणि दिशा यांचाही तिच्या आकुंचनाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. या आढाव्यात दक्षिणाभिमुख हिमनद्यांमध्ये सुमारे १८ टक्के आकुंचन झाल्याचे आढळले आहे.


