(मुंबई)
नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोलवर सोडू नये, असा ठोस निर्णय सरकारने घेतला आहे.
या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन तातडीने कठोर कारवाईची मागणी केली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुळे यांनी सांगितले की, या प्रकरणावर त्या स्वतः लक्ष ठेवणार असून आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत त्या शांत बसणार नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत स्वतः केस मॉनिटरिंग करण्याचा शब्द दिला आहे. “जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही, तोपर्यंत मी वैयक्तिक लक्ष देईन,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
सुळे पुढे म्हणाल्या की, नसरापूरची ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणात राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. माध्यमांनीही ही बाब पुढे आणल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यासोबतच, महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा ‘शक्ती कायदा’ प्रभावीपणे राबवण्याची मागणीही सुळे यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात प्रस्तावित झालेल्या या कायद्यातील सुधारणा तातडीने अमलात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नसरापूर येथील चिमुरड्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, मुलीचा मृत्यू ‘अॅस्फिक्सिया’ म्हणजेच श्वास कोंडल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन अहवालात नमूद केल्याप्रमाणे, आरोपीने मुलीच्या तोंडात कापड कोंबल्यामुळे तिचा श्वास कोंडला गेला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तसेच मुलीच्या शरीरावर जखमांचेही चिन्ह आढळून आले असून, तिच्यावर अत्याचार झाल्यानंतर अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.
अॅस्फिक्सिया म्हणजे काय?
वैद्यकीय भाषेत, जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही किंवा श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो, तेव्हा त्या अवस्थेला ‘अॅस्फिक्सिया’ असे म्हणतात. यामुळे काही मिनिटांतच जीव गमावण्याचा धोका असतो.
माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या पालकांसोबत पुण्यात राहत होती आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी नसरापूर येथे आली होती. खेळत असताना आरोपीने तिला गोठ्यात वासरू दाखवण्याचा बहाणा करून सोबत नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलेल्या तपशीलांमुळे या गुन्ह्याची क्रूरता अधोरेखित झाली आहे. मुलीच्या तोंडात कापड कोंबल्याचा उल्लेख आणि शरीरावरील जखमा यामुळे या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपीवर यापूर्वीही महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणातील पुढील तपास कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

