(ठाणे / वृत्तसंस्था)
भिवंडीतील टीईटी पेपरफुटी प्रकरणात फरार असलेल्या प्रकाश मिसाळ आणि अशोककुमार बाबूलाल शाव या दोन आरोपींना पोलिसांनी अनुक्रमे बीड आणि बिहारमधून अटक केली आहे. दोघांना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या १८ वर पोहोचली आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी न्यायालयात सुमारे ३५०० पानांचे दोषारोपपत्रही दाखल केले आहे.
पोलिस तपासानुसार, यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी कपिल दहिया हा प्रकाश मिसाळला भेटण्यासाठी पुण्यातील एका हॉटेलमध्ये आला होता. या भेटीत टीईटी परीक्षेच्या पेपरच्या खरेदी-विक्रीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे तपासात समोर आले आहे. प्रकाश मिसाळ हा पेपर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो वाचून दाखवणार होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
दुसरा आरोपी अशोककुमार बाबूलाल शाव हा मुख्य आरोपी बीजेंदर कुमार गुप्ता यांच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळले आहे. एजंटमार्फत टीईटीचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेत तो सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याच्या बिहारमधील राहत्या घरातून तपास पथकाने १४९ व्यक्तींच्या नावांची यादी जप्त केली आहे. या यादीमध्ये टीईटी परीक्षेला बसलेल्या १८ परीक्षार्थींची नावे असल्याचे तपासात समोर आले आहे. या व्यक्तींशी आरोपींचे काही आर्थिक व्यवहार झाले होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
नव्याने अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती आरोपींचे वकील अॅड. शैलेश गायकवाड यांनी दिली. या आरोपींच्या चौकशीत टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी २०२६ परीक्षेच्या आदल्या दिवशी जुलै महिन्यात भिवंडीत पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला होता. दिल्लीहून भिवंडीत येऊन तब्बल दीड कोटी रुपयांमध्ये टीईटीच्या प्रश्नपत्रिका संचाच्या विक्रीचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती भिवंडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी पोलिसांनी मुंबई-नाशिक मार्गावरील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत सुरुवातीला तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.


