(खंडाळा / वार्ताहर)
रस्त्यावर सापडलेली एटीएम कार्ड आणि पैसे असलेली पर्स संबंधित महिलेचा शोध घेऊन प्रामाणिकपणे परत करणाऱ्या एसटी बसचे कंडक्टर श्री. सचिन पांचाळ टेंबे यांचे खंडाळा परिसरात कौतुक होत आहे.
वाटद-मिरवणे येथील पात्ये ताई या शनिवारी (दि. १९ सप्टेंबर) सायंकाळी जयगड–मुंबई बसने प्रवास करण्यासाठी खंडाळा बस स्थानकात येत होत्या. बसमध्ये जाण्याच्या घाईत त्यांची पर्स खंडाळा बस स्थानकासमोरील रस्त्यावर पडली. मात्र, पर्स हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.
दरम्यान, रविवारी (दि. २० सप्टेंबर) सकाळी उंडी–रत्नागिरी बस घेऊन आलेले कंडक्टर श्री. सचिन पांचाळ टेंबे यांना बस स्थानकासमोरील रस्त्यावर एक पर्स आढळून आली. त्यांनी पर्स उघडून पाहिली असता त्यामध्ये एटीएम कार्ड आणि पैसे असल्याचे निदर्शनास आले.
पर्सच्या आधारे संबंधित महिलेचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांनी पात्ये ताई यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. पर्स त्यांचीच असल्याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी ती पर्स खंडाळा कंट्रोल ऑफिसचे कंट्रोलर श्री. कांबळे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर पात्ये ताई यांच्या नातेवाईकांकडे ती पर्स परत देण्यात आली.
सापडलेली पर्स स्वतःकडे न ठेवता संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन ती सुरक्षितपणे परत केल्याबद्दल कंडक्टर श्री. सचिन पांचाळ टेंबे यांच्या प्रामाणिकपणाचे खंडाळा परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश नाचरे, श्री. शशिकांत साळस्कर, श्री. लक्ष्मण वाळके, श्री. शेखर भडसावळे, श्री. परेश गुरव आणि श्री. अजय मोघे उपस्थित होते.


