(मुंबई / वृत्तसंस्था)
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात देशातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा साकारला जात आहे. ठाणे खाडीच्या तळाखालून जाणाऱ्या या बोगद्याची लांबी सुमारे ७ किलोमीटर असून, तो एकूण २१ किलोमीटरच्या भूमिगत मार्गाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. नवी मुंबईतील घणसोलीजवळील सावली ते विक्रोळी या दरम्यान बोगद्याचे खोदकाम सुरू आहे. या अभियांत्रिकी कामासाठी तीन हजार टनांहून अधिक वजनाच्या अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीनचा (TBM) वापर केला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान बुलेट ट्रेनच्या मार्गाला महत्त्वाची जोडणी मिळणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) ते शिळफाटा या दरम्यान २१ किलोमीटर लांबीचा भूमिगत बोगदा उभारण्यात येत आहे. त्यातील १६ किलोमीटरचे खोदकाम टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने, तर उर्वरित ५ किलोमीटरचे काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) या तंत्रज्ञानाचा वापर करून केले जात आहे. ठाणे खाडीखालून जाणारा सुमारे ७ किलोमीटरचा पट्टा या संपूर्ण प्रकल्पातील वैशिष्ट्यपूर्ण भाग ठरणार आहे.
या बोगद्याच्या खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या टनेल बोरिंग मशीनचे वजन प्रत्येकी तीन हजार टनांपेक्षा अधिक असून, त्यांच्या कटर हेडचा व्यास १३.६ मीटर आहे. १८ जुलै २०२६ रोजी दुसऱ्या टीबीएमने घणसोलीजवळील सावली येथून विक्रोळीच्या दिशेने खोदकामाला सुरुवात केली. त्यापूर्वी ५ जुलै रोजी पहिल्या मशीनने विक्रोळी येथून बीकेसीच्या दिशेने काम सुरू केले होते. या अत्याधुनिक यंत्रांच्या माध्यमातून एकूण १६ किलोमीटरच्या बोगद्याचे खोदकाम केले जाणार आहे.
बोगद्याच्या बांधकामात समुद्राखालील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विशेष खबरदारी घेतली जात आहे. जमिनीपासून साधारण २५ ते ५७ मीटर खोलीवर हा बोगदा तयार केला जाणार आहे. पारसिक डोंगराखाली त्याची सर्वाधिक खोली ११४ मीटर असेल. बोगद्याचा अंतर्गत व्यास सुमारे १३.१ मीटर ठेवण्यात आला असून, एकाच बोगद्यात दोन्ही दिशांनी धावणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी रुळांची व्यवस्था केली जाणार आहे.
समुद्राखालील खोदकामात पाण्याचा प्रचंड दाब, जमिनीची स्थिरता आणि पाणी झिरपण्याची शक्यता ही प्रमुख अभियांत्रिकी आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी स्लरी-आधारित मिक्सशील्ड टनेल बोरिंग मशीनचा वापर केला जात आहे. खोदकाम जसजसे पुढे जाईल, तसतसे बोगद्याच्या भिंतींना काँक्रीटचे तयार भाग बसवून त्याला मजबुती दिली जाणार आहे. याशिवाय, परिसरातील इमारती आणि जमिनीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सेन्सर्स तसेच विशेष निरीक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
बोगद्याच्या आतील अस्तरीकरणासाठी आवश्यक असलेल्या काँक्रीट सेगमेंटच्या निर्मितीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासाठी महापे येथे स्वतंत्र कास्टिंग यार्ड उभारण्यात आले आहे. एनएसएसआरसीएलच्या माहितीनुसार, या ठिकाणी सुमारे ७७ हजार काँक्रीट सेगमेंट तयार करून त्यापासून ७,७०० रिंग बनवण्यात येणार आहेत. या रिंग बोगद्याच्या आतील संरचनेला आवश्यक मजबुती देण्याचे काम करतील.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील हा २१ किलोमीटरचा भूमिगत मार्ग आणि त्यातील ठाणे खाडीखालून जाणारा समुद्राखालील बोगदा महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः अत्याधुनिक टीबीएम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समुद्राखालील आव्हानात्मक भूभागातून रेल्वे मार्ग उभारण्याचे काम या प्रकल्पातून साकारले जात आहे.


