(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा या विषयी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सुभाष मायंगडे (आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय) उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी केवळ पदवीधर न होता काळाची गरज ओळखून प्रशासकीय सेवांमध्ये आपले करिअर घडवावे, या उद्देशाने एक दिवसीय ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम, अभ्यासाचे नियोजन आणि तयारीसाठी उपलब्ध असलेले विविध स्रोत या विषयी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर बँकिंग परीक्षांचा अभ्यास कसा सुरू करावा, याबद्दल सविस्तर माहिती दिली. स्पर्धा परीक्षेत वेळेचे नियोजन आणि अवांतर वाचन किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले. कार्यशाळेच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, कला विभागप्रमुख सौ. ऋतुजा भोवड,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा. राखी जाधव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागप्रमुख प्रा. हर्षदा लिंगायत यांसोबत इतर प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी पाटील, प्रास्ताविक साईराज शिंदे यांनी केले. तसेच तन्वी पटवर्धन हिने आभार मानले

