(नवी मुंबई / वृत्तसंस्था)
सकाळी नेहमीप्रमाणे दात घासताना संपूर्ण टूथब्रशच चुकून गिळला गेल्याने ५० वर्षीय रिक्षाचालकावर रुग्णालयात उपचार करण्याची वेळ आली. तब्बल १९ सेंटीमीटर लांबीचा हा टूथब्रश पोटात अडकल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. मात्र, कोणतीही शस्त्रक्रिया न करता मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अवघ्या ३० मिनिटांच्या एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे हा टूथब्रश सुरक्षितपणे बाहेर काढला. उपचारानंतर अवघ्या तीन ते चार तासांत रुग्णाला घरी सोडण्यात आल्याने मोठा धोका टळला.
पेण येथील रहिवासी असलेले राजेंद्र माळुसरे हे शारीरिकदृष्ट्या विकलांग असून रिक्षाचालक म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी दात घासत असताना त्यांच्या तोंडातून संपूर्ण टूथब्रश चुकून पोटात गेला. या घटनेनंतर त्यांनी प्रथम स्थानिक डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला; मात्र तपासणीत टूथब्रश दिसून आला नाही. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
तेथे एंडोस्कोपी तपासणी केल्यानंतर १९ सेंटीमीटर लांबीचा संपूर्ण टूथब्रश पोटात अडकल्याचे निदान झाले. या आव्हानात्मक परिस्थितीत मेडिकव्हर हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्युटिक एंडोस्कोपिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने उपचारांची जबाबदारी स्वीकारली.
डॉ. राठोड यांनी सांगितले की, टूथब्रशसारखी लांब आणि कठीण वस्तू पचनमार्गातून बाहेर काढणे हे अत्यंत गुंतागुंतीचे काम असते. वेळीच उपचार न झाल्यास अन्ननलिका किंवा आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच अंतर्गत जखम होण्यासह आतड्याला छिद्र पडण्याचाही धोका असतो.
सुमारे ३० मिनिटे चाललेल्या एंडोस्कोपी प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी एंडोस्कोपला विशेष हूड बसवून टूथब्रशचे एक टोक पकडले. मात्र, पोट आणि अन्ननलिका जोडणाऱ्या भागात तसेच घशातील अरुंद ठिकाणी टूथब्रश अडकल्याने तो बाहेर काढणे आव्हानात्मक ठरले. रुग्णाच्या शरीराची स्थिती बदलत आणि अत्यंत काळजीपूर्वक प्रयत्न करत वैद्यकीय पथकाने अखेर संपूर्ण टूथब्रश तोंडावाटे बाहेर काढण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे, या उपचारासाठी कोणत्याही शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली नाही.
टूथब्रश बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा एंडोस्कोपी करून अन्ननलिकेला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री केली. त्यानंतर काही काळ रुग्णाला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तीन ते चार तासांत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
दरम्यान, टूथब्रश किंवा अन्य कोणतीही मोठी वस्तू चुकून गिळली गेल्यास वेळ न घालवता वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशा परिस्थितीत स्वतःहून उलटी करण्याचा प्रयत्न करू नये किंवा अन्न खाऊन वस्तू खाली ढकलण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे घसा आणि अन्ननलिकेला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. वेळेत उपचार मिळाल्याने शस्त्रक्रिया टळली आणि सुरक्षितपणे घरी परतता आले, याबद्दल राजेंद्र माळुसरे यांनी डॉक्टरांचे आभार मानले.


