(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने मालवाहू ट्रक चालवून अपघात घडविल्याप्रकरणी एका चालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. साळवी स्टॉप ते हातखंबा मुख्य मार्गावर सोमवारी (९ फेब्रुवारी) रात्री सुमारे दहा वाजता ही घटना घडली होती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली, तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
मस्तान आयुबसाहेब पटेल (४८, रा. खोतवाडी, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पटेल हा एसएमएल कंपनीचा ‘सम्राट जीएस’ मॉडेलचा मालवाहू ट्रक (एमएच ४३ बीपी ४१५१) साळवी स्टॉपकडून हातखंब्याकडे नेत होता. त्यावेळी त्याने मद्यप्राशन केले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. साळवी स्टॉप परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना, परिस्थितीचा पुरेसा अंदाज न घेता आणि वेगावर नियंत्रण न ठेवता वाहन चालविल्याने ट्रकवरील ताबा सुटला. परिणामी, वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळले. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचे पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश भास्कर भुजबळराव (५२) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १८५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

