(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी गणपती बाप्पांचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी स्टेशन मास्तरांकडे असलेल्या तक्रार वहीत या मागणीची अधिकृत नोंद करण्यात आली.
संगमेश्वर रोड स्थानकावर १०११५/१०११६ बांद्रा–मडगाव एक्सप्रेस, १६३११/१६३१२ श्री गंगानगर एक्सप्रेस, १२९७७/१२९७८ अजमेर–एर्नाकुलम एक्सप्रेस आणि ०२१९७/०२१९८ जबलपूर–कोयंबतूर एक्सप्रेस या चार साप्ताहिक गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. आता गणेशोत्सवाची सांगता होत असताना मुंबईसह अन्य शहरांकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाढती संख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेऊन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी सातत्याने होत आहे.
या चारही गाड्यांना संगमेश्वर रोड येथे थांबा मिळाल्यास संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील प्रवाशांना मुंबई, राजस्थान, उत्तर भारत, केरळ, मध्य प्रदेश तसेच दक्षिण भारतातील विविध भागांमध्ये प्रवास करण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची वाढती संख्या आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या चारही साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना लवकरात लवकर थांबा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, गणपती बाप्पांचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’च्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आलेल्या या अनोख्या मागणीची स्थानक परिसरात चांगलीच चर्चा रंगली.


