(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या निष्काळजीच्या कामांमुळे प्रवाशांसह वाहन चालकांना विनाकारण मनस्ताप होत आहे. आता एसटी स्थानकासमोरील तुटलेल्या मोरीमुळे वाहनचालकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कडेला तयार झालेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वारंवार वाहने अडकत असून, अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मंगळवारी रात्री गॅस सिलेंडरची वाहतूक करणारी बोलेरो गाडी याच ठिकाणी अडकली. स्थानिक रिक्षाचालकांनी तत्परता दाखवत मदत केल्यामुळे वाहन सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
तुटलेल्या मोरीमुळे वाढला धोका
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, महामार्गाच्या कामादरम्यान बसविण्यात आलेल्या जुन्या सिमेंटच्या पाईप मोडल्याने रस्त्यालगत मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या ठिकाणी कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था नसल्याने बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना धोका लक्षात येत नाही. परिणामी, लहान-मोठी वाहने वारंवार या खड्ड्यात अडकत असल्याचे सांगितले जाते.
दोन दिवसांपूर्वी एसटी बस चार तास अडकली
यापूर्वी दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यासमोरील सेवा रस्त्यावर एक एसटी बस अडकली होती. स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित रस्ता बंद असतानाही आवश्यक बॅरिकेड्स किंवा सूचना फलक लावण्यात आले नव्हते. त्यामुळे चालकाने तो मार्ग सुरू असल्याचा समज करून बस पुढे नेली. मात्र पुढे रस्ता नसल्याने बसचे चाक मातीत रुतले आणि तब्बल चार तास वाहतूक विस्कळीत झाली.
बस बाहेर काढण्यासाठी दोन हायड्रा मशीनची मदत घ्यावी लागली. या घटनेत बसमधील प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागला होता.
गॅस सिलेंडरची वाहतूक करणारी बोलेरो पुन्हा अडकली
मंगळवारी रात्री पुन्हा त्याच धोकादायक ठिकाणी गॅस सिलेंडरची वाहतूक करणारी बोलेरो अडकली. संवेदनशील माल वाहून नेणारे वाहन अडकल्याने काही काळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी स्थानिक रिक्षाचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला वाहन बाहेर निघत नसल्याने दुसऱ्या वाहनाच्या मदतीने आणि सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून बोलेरो सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. स्थानिकांनी रिक्षाचालकांच्या तत्परतेचे कौतुक केले.
सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एसटी स्थानकासमोरील या ठिकाणी अद्यापही पुरेसे बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर किंवा इशारा फलक लावण्यात आलेले नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा दिसून न आल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. अनेक दुचाकीस्वारही या ठिकाणी घसरल्याच्या घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
वारंवार घडणाऱ्या घटनांनंतरही तुटलेली मोरी दुरुस्त करण्यात आलेली नसल्याने स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच तातडीने मोरीची दुरुस्ती करावी, योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी दुरुस्ती करून या धोकादायक ठिकाणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावणे आवश्यक आहे, अशी मागणी केली जात आहे.

