(देवळे/प्रकाश चाळके)
देवळे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. एस. कानडे आयडियल हायस्कूल, देवळे येथील सहायक शिक्षिका सौ. ऐश्वर्या उद्धव शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शाळेत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक आणि संस्थेचे मान्यवर उपस्थित होते.
सौ. शिंदे यांनी १९९८ ते २००३ या काळात न्यू इंग्लिश स्कूल, पुनस (ता. लांजा) येथे विनाअनुदानित शिक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर २००३ मध्ये त्यांनी देवळे येथील एन. एस. कानडे आयडियल हायस्कूलमध्ये रुजू होऊन तब्बल २२ वर्षे शिक्षण सेवा दिली. या कालावधीत त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवले, त्यांच्यात आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकता निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवले. सौ. शिंदे यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, मनमिळाऊ स्वभाव आणि विद्यार्थ्यांशी असलेल्या आत्मीय नात्यामुळे या सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.
कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी मनोगते व्यक्त करत सौ. शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. संस्थेच्या वतीने अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या सहकाऱ्यांबरोबरच त्यांच्या माहेरच्या परिवाराकडूनही विशेष सन्मान करण्यात आला. या भावनिक सन्मानाने सौ. शिंदे भारावून गेल्या.
आपल्या प्रत्युत्तरातील मनोगतात सौ. शिंदे म्हणाल्या, “ज्ञानदान हे माझं पूज्य कार्य होतं. शिक्षणाच्या या प्रवासात सहकार्य आणि साथ देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. ज्ञानदीप अखंड पेटत राहावा, हीच माझी इच्छा आहे.”
कार्यक्रमास संस्था अध्यक्ष श्री. निलेश कोळवणकर, संस्था सदस्य श्री. यशवंत घागरे, श्री. गजानन मोघे, मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया गार्डी, कवी व माजी विद्यार्थी श्री. भूपाळ चव्हाण तसेच चव्हाण कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शरद गार्डी यांनी केले. समारंभात उपस्थित सर्वजण भावुक झाले होते. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे समर्पित आयुष्य सर्वांकडून आदर व सन्मानाने गौरवले गेले.

