(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील शिक्षक भरतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या ४७८ शिक्षण सेवकांच्या भरती प्रक्रियेतील ४५७ पात्र उमेदवारांचे समुपदेशन मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. विशेष म्हणजे, समुपदेशनाच्या दिवशीच पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याने जिल्हा परिषदेला लवकरच ४५७ नवीन शिक्षक मिळणार आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची तब्बल १,०२७ पदे रिक्त आहेत. शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने अनेक शाळांमध्ये केवळ एक किंवा दोन शिक्षकांच्या बळावर अध्यापनाचा गाडा सुरू ठेवण्याची वेळ आली आहे. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता व्यक्त होत असून, शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी पालकांकडूनही होत होती. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात ४७८ पदांची भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली. भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांची तीन टप्प्यांत कागदपत्र पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये ४५७ उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून पडताळणी पूर्ण केली, तर २१ उमेदवार विविध कारणांमुळे गैरहजर राहिले. कागदपत्र पडताळणी पूर्ण होऊन आठवडा उलटूनही समुपदेशनाची तारीख जाहीर न झाल्याने पात्र उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. समुपदेशन कधी होणार, याबाबत अनेक उमेदवारांकडून शिक्षण विभागाकडे दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे वारंवार विचारणा केली जात होती.
२२ सप्टेंबरला शाळा वाटप
अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी २२ सप्टेंबर रोजी समुपदेशन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र शिक्षण विभागाकडून सर्व ४५७ पात्र उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेलवर पाठविण्यात आले आहे. समुपदेशन प्रक्रियेनंतर उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार उपलब्ध शाळांचे वाटप करण्यात येणार असून, त्यानंतर तातडीने संबंधित शाळांमध्ये रुजू होण्याचे आदेश दिले जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांच्या रिक्त पदांपैकी मोठा हिस्सा भरला जाणार आहे.
शिक्षकांचा तुटवडा काही प्रमाणात भरून निघणार
४५७ नवीन शिक्षकांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील अनेक शाळांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, विद्यमान शिक्षकांवरील अध्यापनाचा अतिरिक्त भार कमी होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनाला यामुळे अधिक स्थैर्य मिळू शकते. दरम्यान, जिल्ह्यात अद्याप शिक्षकांची १,०२७ पदे रिक्त असल्याने पहिल्या टप्प्यातील भरतीनंतर उर्वरित रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे आता शिक्षक पदासाठी पात्र उमेदवारांसह पालक आणि ग्रामीण भागातील शाळांचे लक्ष लागले आहे.


