(रत्नागिरी / वार्ताहर)
आंबाघाट मार्गावर दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आंबाघाट मार्गे कोल्हापूरला जाणाऱ्या एसटी बसफेऱ्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून, लांजा-वाटूळ-ओणी-पाचल-अणुस्कुरा-मलकापूर मार्गे कोल्हापूर अशा पर्यायी मार्गाने फेऱ्या चालविण्याचे आदेश रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी दिले आहेत.
आंबाघाट मार्गावर दरड कोसळल्याने पुढील आदेश येईपर्यंत आंबाघाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विभागातील आगारांमार्फत आंबाघाट मार्गे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व एसटी फेऱ्या पर्यायी मार्गाने चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पर्यायी मार्गामुळे एसटी बसफेऱ्यांच्या मार्गात सुमारे ४२ किलोमीटरने वाढ होणार आहे. तसेच प्रवास भाड्यामध्ये सुमारे ७ टक्क्यांनी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील अणुस्कुरा-मलकापूर टप्पा पत्रकात आवश्यक बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आंबाघाट मार्गावरील वाहतूक बंद असल्याने सध्या रत्नागिरी विभागातील आगारांमार्फत सुरू असलेल्या प्रत्येक फेरीसाठी दैनंदिन सुमारे ४२ किलोमीटर अंतर वाढणार आहे. त्यानुसार दैनंदिन चालविण्याचा अहवाल तयार करून संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट परिसरात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली असून, ओझरे खिंडीत रस्त्याला तडे गेल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची झालेली धूप आणि संभाव्य भूस्खलनाचा धोका लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने आंबा घाटातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तातडीने पूर्णबंदी घातली आहे.
आंबा घाटातील किमी ६७.१४० ते ७४.६०० दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरून माती व दगड घसरण्याची शक्यता वाढली आहे. ओझरे खिंड परिसरात भूस्खलनासह रस्त्याला तडे गेल्याने वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेषतः किमी ६९.५०० ते ६९.७०० दरम्यानचा भाग खोल दरीलगत असल्याने अधिक धोकादायक बनला आहे. या ठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास भूस्खलन होऊन रस्त्याचा काही भाग खचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आंबा घाट मार्गावरील सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीला तातडीने पूर्णबंदी केली आहे. प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, तसेच संभाव्य दुर्घटना टाळता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, घाटातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून रस्त्याची सद्यस्थिती तपासली जात असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. पावसाचा जोर आणि रस्त्याची स्थिती लक्षात घेऊन पुढील वाहतूक व्यवस्थेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
या बदलामुळे रत्नागिरी, चिपळूण, देवरूख, लांजा आणि राजापूर आगारांतून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. आंबाघाट मार्ग पूर्ववत सुरू होईपर्यंत एसटी वाहतूक या पर्यायी मार्गाने सुरू राहणार आहे.
पर्यायी मार्ग : आंबाघाटऐवजी लांजा – वाटूळ – ओणी – पाचल – अणुस्कुरा – मलकापूर – कोल्हापूर.

