(संगमेश्वर)
जनता विद्यालय, आंगवली (ता. संगमेश्वर) येथील शिक्षकेतर कर्मचारी रणजित रविंद्र पवार यांना “कामगार नेता नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार – २०२५” या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
हा पुरस्कार राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) तर्फे आयोजित सातवे महाराष्ट्र राज्य अधिवेशन २०२५ या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. हा सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंजपेठ, पुणे येथे पार पडला.
शिक्षकेतर सेवेत पवार यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाची, शिस्तबद्धतेची आणि जबाबदारीची दखल घेत ही निवड करण्यात आली. त्यांनी आपल्या कार्यतत्परतेद्वारे संस्थेचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे, असे आयोजकांनी सांगितले.
या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना रणजित पवार म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या आई, गुरुजन, सहकाऱ्यांना आणि संस्थेला समर्पित आहे. हे यश मला समाजासाठी अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा देते.” या सन्मानामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संगमेश्वर तालुक्याचा अभिमान अधिक उंचावला आहे.

