(खेड / वार्ताहर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात शुक्रवारी केमिकल टँकर असलेल्या कंटेनर ट्रकचा भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा हा भरधाव ट्रक महामार्गालगत सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या तब्बल २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कंटेनर ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, सुदैवाने चालक या दुर्घटनेतून आश्चर्यकारकरीत्या बचावला.
भोस्ते घाटाचा तीव्र उतार उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर ट्रक थेट दरीत कोसळला. वाहनावरील केमिकलची टाकी वेगळी होऊन सुमारे २५० फूट खाली जाऊन आदळल्याने मोठा आवाज झाला. या घटनेने परिसरात काही काळ खळबळ उडाली. वाहनाची झालेली दुरवस्था पाहता जीवितहानीची शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र चालकाला केवळ किरकोळ दुखापती झाल्या असून तो सुखरूप बचावला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेले पोलीस तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी दरीत उतरून युद्धपातळीवर बचावकार्य राबवले आणि चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी कळंबोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
दरीत कोसळलेल्या केमिकल टाकीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. वाहनामध्ये नेमके कोणते रासायनिक द्रव्य होते आणि त्यातून परिसराला कोणताही धोका निर्माण होऊ शकतो का, याची खातरजमा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.
दरम्यान, घाटातील तीव्र उतारामुळे ट्रकचे ब्रेक निकामी झाले असावेत, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघात वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणामुळे, याबाबत पोलिसांकडून अधिकृत तपास सुरू आहे. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणेने वाहतूक सुरळीत केली.


