(खेड)
स्थानिक पोलिसांनी अमली पदार्थविरोधी आणि अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत तालुक्यात दोन ठिकाणी कारवाई करत गांजा आणि गुटखा जप्त केला आहे. या दोन स्वतंत्र कारवायांत एकूण १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबके-कोरेगाव रस्त्यावर गस्तीदरम्यान संशयित हालचाली करणारे राहिद अब्दुल रौफ जमादार (३५) आणि मुरसलीन बशीर नाडकर (३०) यांना पोलिसांनी थांबवून तपासले असता त्यांच्या जवळ १६२ ग्रॅम वजनाचा, अंदाजे २,४२५ रुपये किमतीचा गांजा आढळला. दोघांना त्वरित ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गांज्याचा पुरवठा कोणत्या स्रोताकडून झाला आणि तो विक्रीसाठी कोणाकडे जाणार होता, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी फुरुस येथील एका टेलरिंग दुकानात धाड टाकून १० हजार ७२० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दुकानमालक वाहिद अब्दुल कादिर परकार (५१) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १२३, २२३, २७५ सह अन्नसुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या कलम ५९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोन्ही कारवायांत खेड पोलिस ठाण्याचे पथक सहभागी होते. पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील अमली पदार्थ आणि प्रतिबंधित खाद्यपदार्थांच्या अवैध विक्रीवर सतत नजर ठेवली जाणार आहे. या कारवायांमुळे स्थानिक गुन्हेगारीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

