(खेड / वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथे बुधवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार राजेश मोहिते (रा. हेदली) आणि त्यांच्यासोबत प्रवास करणारी महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर दोघांनाही उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश मोहिते हे पत्नीला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुचाकीवरून घरी घेऊन जात होते. भरणे शिंदेवाडी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी ते मुंबई-गोवा महामार्ग ओलांडत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या GJ 15 CQ 1300 क्रमांकाच्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे तसेच कारचे अनेक भाग महामार्गावर विखुरले. दुचाकीवरील सामानही रस्त्यावर पडले होते. अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दुचाकीला धडक दिल्यानंतर कार महामार्गालगत असलेल्या कठड्यावर जाऊन आदळली. या धडकेत कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून कारचालकालाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या राजेश मोहिते आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेला तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजेश मोहिते यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अपघाताची माहिती मिळताच जय हिंद रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. दरम्यान, खेड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा व आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. अपघाताची नेमकी कारणे आणि कारचालकाच्या भूमिकेबाबत खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.

