(खेड / वार्ताहर)
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील कोका-कोला कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याचा आरोप होत असून, या प्रकरणावरून भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनीत नियमितपणे काम करणाऱ्या खेड तालुक्यातील सुमारे ८ ते १० स्थानिक कर्मचाऱ्यांना कोणतेही समाधानकारक कारण किंवा पूर्वसूचना न देता अचानक कामावरून कमी करण्यात आले. या निर्णयामुळे संबंधित कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर ॲड. वैभव खेडेकर यांनी कंपनीच्या एचआर मॅनेजरसह संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत, आठ दिवसांच्या आत सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी त्यांनी केली. निर्धारित मुदतीत कंपनीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास स्थानिकांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ॲड. खेडेकर यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे खेड तालुक्यासह औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

