(लोटे/ खेड)
मेहनती आणि होतकरू खेळाडू कु. तन्वी चैताली भूषण रेडीज हिच्या निवासस्थानी भाजपा विधान परिषदेचे आमदार श्री. प्रमोद जठार तसेच भाजपा नेते व खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी सदिच्छा भेट देत तिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
तन्वीने गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही गटांत सुवर्णपदक पटकावून विश्वविजेती होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, तन्वीचे हे यश केवळ पदकांपुरते मर्यादित नसून कठोर परिश्रम, शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वास यांचे जिवंत उदाहरण आहे. खेळातील विजय एका दिवसात मिळत नाही, त्यामागे अथक मेहनत, त्याग आणि संकटांशी दिलेला संघर्ष दडलेला असतो. तन्वीने आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध केले आहे की, ध्येय स्पष्ट आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला कोणतीही सीमा राहत नाही. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे आपल्या मातृभूमीचा आणि देशाचा गौरव जागतिक स्तरावर उंचावला असून याचा प्रत्येकाला अभिमान वाटतो, असेही त्यांनी नमूद केले.
आजच्या तरुण पिढीसमोर तन्वीसारखा आदर्श निर्माण होणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे सांगत, तिच्या कर्तृत्वामुळे असंख्य मुलींना नवी दिशा आणि प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही नम्रता, सातत्य आणि शिकण्याची वृत्ती कायम ठेवणे हेच खऱ्या विजेत्याचे लक्षण असल्याचे सांगत पुढील काळातही तन्वीने याच जिद्दीने आणि आत्मविश्वासाने वाटचाल करत देशासाठी आणखी सुवर्ण क्षण निर्माण करावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, उपाध्यक्ष संजय आखाडे, तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भूषण रेडीज, शुभम गायकवाड, स्वराज गांधी, सौ. चैताली रेडीज, शंतनु रेडीज, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

