(रत्नागिरी /प्रतिनिधी)
अरबी समुद्रात प्रवास करीत असलेल्या MV REK ELITE या जहाजावरील ३५ वर्षीय इजिप्शियन नागरिकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. इस्लाम आदेल अहमद अब्देल लतिफ (वय ३५, व्यवसाय—सेफ्टी ऑफिसर/थर्ड ऑफिसर, इजिप्तचा नागरिक) यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळाच्या अधिकारक्षेत्राचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या प्रकरणाची कागदपत्रे रत्नागिरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आली असून, पुढील चौकशी जयगड सागरी पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, MV REK ELITE हे जहाज १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास अरबी समुद्रातील १४.१० N/५५.२८ E या लोकेशनवर असताना ही घटना घडल्याचे नमूद आहे. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद-खंडाळा येथील अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून १६ एप्रिल रोजी दुपारी १२.४५ वाजता जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर MV REK ELITE जहाजावर वैद्यकीय कार्यवाही करण्यात आल्याची नोंद आहे. सदर अकस्मात मृत्यूचे घटनास्थळ यलो गेट पोलिस ठाणे, मुंबई यांच्या हद्दीत येत नसल्याने तेथील पोलिसांकडून या प्रकरणाची कागदपत्रे परत रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आली. त्यानंतर कार्यालयीन आदेशानुसार सदर प्रकरणाची कागदपत्रे पुढील चौकशीसाठी जयगड सागरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली.
रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून १० सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, प्राप्त कागदपत्रांच्या आधारे अकस्मात मृत्यू प्रकरणाची पुढील चौकशी करून ते मुदतीत निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार जयगड सागरी पोलिस ठाण्यात अ.मृ. क्रमांक ३५/२०२६ अशी नोंद करण्यात आली असून, बीएनएसएस कलम १९४ अन्वये पुढील चौकशी सुरू आहे. परदेशी नागरिकाच्या मृत्यूशी संबंधित असल्याने या प्रकरणातील मृत्यूचे नेमके कारण, घटनाक्रम आणि उपलब्ध वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे पुढील तपासात स्पष्ट होणार आहे.


