(रत्नागिरी)
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर आता अभिनेता राहुल सोलापूरकरने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही चुकीचे एकेरी वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्याने आंबेडकरी जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे. या सोलापूरकरवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी भीमशक्ती कोकण प्रदेश अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी माध्यमांद्वारे केली आहे.
राहुल सोलापूरकरचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोलापूरकर हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे एकेरी वक्तव्य करीत असल्याचे दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार मांडला. विषमतेचे प्रतीक असणाऱ्या ब्राम्हण्यवादाचा, चातुर्वर्णाचा विरोध केला आहे. त्याच ब्राम्हण्यवादातून बाबासाहेबांना ब्राह्मण ठरविण्याचा आटापिटा सोलापूरकरने केला आहे. त्याच्या वादग्रस्त विधानाने आंबेडकरी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्याच्यावर अँट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून तात्काळ अटक केली पाहिजे, असे कांबळे यांनी म्हटले आहे.