(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मित्रांमध्ये सुरू असलेली साधी मस्करी क्षणात वादात परिवर्तित होऊन त्याचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना जयगड परिसरातील महिंद्रा लेबर कॉलनीत घडली. हाताला चुकून धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी एका युवकाला दगड व लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रप्रकाश ओमप्रकाश चौधरी (वय २४) आणि त्यांचा मित्र विकास विश्वकर्मा हे २१ जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आपल्या खोलीसमोर जेवण बनवत असताना परस्परांमध्ये मस्करी करत होते. त्याचवेळी जवळील खाटेवर झोपलेल्या रामलखन निसाद याच्या अंगाला फिर्यादीचा हात चुकून लागला. या प्रकाराचा राग मनात धरून रामलखन निसाद याने फिर्यादीला शिवीगाळ करत, “तुमच्याकडेच माणसे आहेत का? माझ्याकडे ४० माणसे आहेत, दाखवू का?” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने राजकुमार निसाद याला घटनास्थळी बोलावून घेतले. दोघांनी मिळून चंद्रप्रकाश चौधरी यांच्यावर हल्ला चढविला. रामलखन निसाद याने दगडाने मारून दुखापत केली, तर राजकुमार निसाद याने लाकडी बांबूने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या साक्षीदारांनाही आरोपींनी लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या खोलीचा दरवाजा तोडून नुकसान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी २२ जून रोजी सायंकाळी जयगड पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस करीत आहेत.

