(रत्नागिरी)
मुंबईतील सायन ते सापुचेतळे असा खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची बॅग अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. या बॅगेत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 42 हजार 748 रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी पूर्णगड सागरी सुरक्षा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. 27) सकाळी साडेनऊ ते मंगळवारी (ता. 28) सकाळी पावणे सात या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रांत नंदकुमार साळुंके (वय 44, मूळ रा. देवरुख-आंगवली, ता. संगमेश्वर; सध्या रा. बदलापूर पश्चिम) हे सायन येथून सापुचेतळे या मार्गावर खासगी ‘कुलस्वामिनी’ ट्रॅव्हल्स (क्र. MH-03 CV 7700) मधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग चोरून नेली.
या बॅगेत सुमारे 7 तोळे 5 ग्रॅम वजनाचे, अंदाजे 1 लाख 40 हजार 747 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच 2 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 42 हजार 748 रुपयांचा मुद्देमाल होता.
या घटनेबाबत साळुंके यांनी पूर्णगड सागरी सुरक्षा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

