(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
वयोवृद्ध आईचा सांभाळ करावा लागत असल्याने कुठेही फिरायला मिळत नाही, या कारणावरून ९१ वर्षीय वृद्धेला लाकडी बांबू आणि हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथे घडली आहे. या मारहाणीत वृद्धेच्या उजव्या गुडघ्याला, डाव्या पायाला आणि उजव्या मनगटाला दुखापत झाल्याची तक्रार असून, याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुलेखा इसाक मोडक (वय ९१, रा. नायरी, ता. संगमेश्वर) असे मारहाण झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी जैबुन्निसा निजामुद्दीन लांबे (वय ६०, रा. सीवूड्स, नेरूळ, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. नाशिरा अस्लम मोडक (रा. नायरी, ता. संगमेश्वर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान नायरी येथील राहत्या घरी हा प्रकार घडला. वृद्ध आईचा सांभाळ करावा लागत असल्याने तिला कुठेही फिरायला जाता येत नाही, या कारणावरून संशयित महिलेने जुलेखा मोडक यांना लाकडी बांबूने तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या मारहाणीत त्यांच्या उजव्या गुडघ्याला, डाव्या पायाला आणि उजव्या मनगटाला लहान-मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सीसीटीएनएस प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या नोंदीच्या आधारे संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२) आणि ११८(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.


