(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
आंबव हनुमान स्टॉप परिसरात बंद हॉटेलच्या पाठीमागील शेडजवळ गांजासदृश अंमली पदार्थाचे सेवन केल्याच्या आरोपावरून देवरुख पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई केली. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(क) आणि २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबव हनुमान स्टॉप येथील ‘हॉटेल ड्रायव्हर डेलिकेशन’ या बंद हॉटेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेडजवळ दोघे गांजा सदृश अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याचे आढळून आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन नामदेव कामेरकर (३८) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून ओकार हरिशचंद्र सुर्वे (३०, व्यवसाय—किराणा दुकान, रा. निवे बुद्रुक, सरोदेवाडी, ता. संगमेश्वर) आणि अजित उर्फ आऊ अनंत चव्हाण (५५, व्यवसाय—वेल्डिंग, रा. देवरुख, मच्छी मार्केटशेजारी, ता. संगमेश्वर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ही घटना १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दोघे बंद हॉटेलच्या पाठीमागील शेड परिसरात अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याचे आढळले. त्यानंतर रात्री ९.४५ वाजता देवरुख पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क) आणि २७ अन्वये कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे.


