(नाणीज / वार्ताहर)
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र नाणीजधामच्या सुंदरगडावर हजारो भाविकांच्या साक्षीने जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘सनातन पंथ शास्त्र’ या ग्रंथाचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
या सोहळ्याला काँग्रेस नेते नानाभाऊ पटोले, औसा (लातूर)चे आमदार अभिमन्यू पवार, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, कोकण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, रत्नागिरी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग, प्रांताधिकारी जीवन देसाई, नाणीजचे सरपंच विनायक शिवगण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी रचलेला ‘सनातन पंथ शास्त्र’ हा ग्रंथ सनातन धर्माचे तत्त्वज्ञान, परंपरा, संस्कार आणि शास्त्रोक्त विचार सर्वसामान्यांना सहज समजेल अशा सोप्या, ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण भाषेत मांडणारा आहे. ग्रंथाचे लोकार्पण होताच उपस्थित हजारो भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी जगद्गुरु श्रींच्या अध्यात्म, समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य आणि मानवकल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले. समाजाला विधायक दिशा देणारे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मार्गदर्शन करताना जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज म्हणाले, “या संतपीठावर सर्वपक्षीय लोक एकत्र येतात, हीच सनातन धर्माची खरी ताकद आहे.”
देहदान व अवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांचा सन्मान
या कार्यक्रमात जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेने सुरू असलेल्या मरणोत्तर देहदान व अवयवदान जनजागृती अभियानात सहभागी झालेल्या कुटुंबीयांचा विशेष कृतज्ञता सन्मान करण्यात आला. आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर देहदानाचा महान निर्णय घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कुटुंबीयांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेने आतापर्यंत २२७ मरणोत्तर देहदान घडून आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ-व्हिडिओ संदेशाद्वारे जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज तसेच देशभरातील भक्तांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात त्यांनी जगद्गुरु श्रींच्या मानवसेवा, समाजजागृती आणि विविध लोककल्याणकारी उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. मात्र, तातडीच्या शासकीय कामामुळे त्यांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही. त्यांनी दूरध्वनीद्वारे जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज तसेच उपस्थित हजारो भाविकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर पार पडलेला ‘सनातन पंथ शास्त्र’ ग्रंथाचा लोकार्पण सोहळा, देहदान व अवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांचा कृतज्ञता सन्मान आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम भक्तांसाठी प्रेरणादायी व अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्रद्धा बोडेकर यांनी केले.

