(रत्नागिरी / वार्ताहर)
कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी या रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, तसेच प्रवाशांच्या विविध प्रलंबित समस्या मार्गी लागाव्यात, यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी कोकण रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकांची (COM) भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली.
या भेटीदरम्यान संबंधित रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांचे थांबे उपलब्ध करून देण्याचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. त्याचबरोबर प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा आणि स्थानकांशी निगडित विविध प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोकणातील प्रवाशांची दैनंदिन गरज आणि रेल्वे प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन या मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करावी, अशी आग्रही भूमिका आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी मांडली.
संबंधित रेल्वे स्थानकांवरील प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा यापुढेही सुरू ठेवण्याचे आश्वासन आमदार प्रमोद जठार यांनी दिले.


