(संगमेश्वर / वार्ताहर)
दिवा येथून गणेशोत्सव तसेच इतर सणांच्या काळात विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या दिवा–चिपळूण मेमू सेवेचा विस्तार करून ती दिवा–संगमेश्वर मार्गावर सुरू करण्यात यावी, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुपच्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात कोकण रेल्वेला निवेदन सादर करण्यात आले असून, ही सेवा संगमेश्वरपर्यंत वाढविल्यास कामथे, सावर्डे, आरवली, कडवई आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सणासुदीच्या काळात गावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. अनेकदा जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ येते. तसेच या भागातील अनेक नागरिक रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी नियमितपणे मुंबई व उपनगरांकडे प्रवास करत असतात. त्यामुळे दिवा–संगमेश्वर मेमू सेवा सुरू झाल्यास प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या मार्गावर सणासुदीच्या दिवसांसह नियमित काळातही मोठ्या प्रमाणावर प्रवासी संख्या असल्याने मेमू सेवेला उत्तम प्रतिसाद मिळेल, असेही रेल्वे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले. प्रवाशांच्या सोयीचा विचार करून कोकण रेल्वेने दिवा–संगमेश्वर मेमू सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी केली आहे.

