(देवळे /प्रकाश चाळके)
दाभोळे जिल्हा परिषद गटातील विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी दाभोळे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विशेष प्रभाग सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती विलास चाळके यांनी विविध विभागांशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून संबंधित विषयांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
सभेच्या प्रारंभी विलास चाळके यांनी जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यानंतर ग्रामस्थांनी विविध स्थानिक समस्या मांडत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
बैठकीत रिक्त शिक्षक आणि ग्रामसेवक पदांचा प्रश्न ठळकपणे उपस्थित करण्यात आला. अनेक गावांमध्ये ही पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामांवर परिणाम होत असल्याचे सांगत ती तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली.
शेती व भाजीपाला पिकांवर वाढलेल्या माकडांच्या उपद्रवाचाही मुद्दा चर्चेत आला. यावर बोलताना विलास चाळके यांनी हा विषय आमदार किरण सामंत यांच्या निदर्शनास आणून दिला असून, वनविभागाला माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी सापळे लावण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती दिली.
गावांतील सरपंच आणि सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेक ठिकाणी सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांना अत्यंत मर्यादित अधिकार देण्यात आल्याने गावातील विकासकामे आणि दैनंदिन प्रशासकीय कामे रखडत असल्याची तक्रार सरपंचांनी केली. त्यामुळे प्रशासकांना नियमित सरपंचांप्रमाणे अधिकार देण्याची मागणीही सभेत करण्यात आली.
दाभोळे, कनकाडी आणि मेघी येथील ग्रामस्थांनी संबंधित कृषी सहाय्यकांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कृषी सहाय्यक गावात नियमित येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि लागवडीबाबत वेळेवर माहिती मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
प्रभाग सभेला परिवहन विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. बंद झालेल्या एसटी फेऱ्या, वेळापत्रकाचे पालन न करणाऱ्या बसेस आणि त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबाबत उत्तर कोण देणार, असा सवाल उपस्थितांनी केला.
या सभेला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शंकर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रजनी चिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे बापू शिंदे, माजी सभापती जयसिंग माने, पुर्ये गावाचे उपसरपंच बापू लोटणकर, पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये, पंचायत समिती सदस्या दीपाली जाधव, राजेश प्रत्याणे यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

