(राजापूर /प्रतिनिधी)
जैतापूर–हातिवले मुख्य मार्गावरील डोंगरतिठा येथे दोन कारची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात टाटा पंचमधील महेश थळेश्री आणि काव्या थळेश्री हे दोघे जखमी झाले. गुरुवारी (१७ सप्टेंबर) सकाळी सुमारे ११.१० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. धडकेत दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले असून, अपघातप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निळकंठ सुभाष थळेश्री (३२, रा. नाटे, थळेश्रीवाडी, ता. राजापूर) हे त्यांच्या ताब्यातील टाटा पंच (एमएच ०८/बीई ०५८५) घेऊन नाटेहून कणकवळीच्या दिशेने प्रवास करीत होते. डोंगरतिठा येथे आल्यानंतर त्यांच्या वाहनाला सागवे रोडवरून डोंगर गावाच्या दिशेने जाणाऱ्या स्वीफ्ट डिझायर (एमएच ४६/बीके ३१५७)ची धडक बसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. स्वीफ्ट डिझायरचा चालक उमेश राजाराम हिंदळेकर (४५, रा. कन्नमवार नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई) हा सागवे रोडवरून डोंगरच्या दिशेने जात होता. जैतापूर–हातिवले या मुख्य मार्गावर प्रवेश करताना मुख्य रस्त्यावरील वाहने पाहून सावधगिरीने रस्ता ओलांडणे अपेक्षित असताना, त्याने वाहतुकीकडे पुरेसे लक्ष न देता वाहन भरधाव वेगाने चालविल्याचा आरोप आहे.
याचदरम्यान स्वीफ्ट डिझायर अचानक मुख्य रस्त्याच्या मध्यभागी आल्याने टाटा पंचला धडक बसली. या अपघातात टाटा पंचमधील महेश थळेश्री आणि काव्या थळेश्री यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले. या प्रकरणी चालक उमेश हिंदळेकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा पुढील तपास राजापूर पोलिसांकडून सुरू आहे.


