(रत्नागिरी /प्रतिनिधी)
दुसऱ्याच्या मदतीसाठी धावणाऱ्या एका कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्याच्या आयुष्याचीच वाटेत अखेर झाली. आंजणारी येथील भीषण अपघातात हातखंबा येथील वाहतूक सहाय्यता केंद्रात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) संतोष आप्पासाहेब गायकवाड (वय ५१) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कंटेनरचालक आणि क्लीनरलाही या अपघातात प्राण गमवावे लागले. मात्र, गायकवाड यांच्या जाण्याने एका कुटुंबाचा आधार हरपला असून, आपल्या लेकीला हॉटेल व्यवसायात स्वतःच्या पायावर उभे करण्याचे त्यांचे स्वप्नही काळाच्या पडद्याआड गेले आहे. कर्तव्य बजावताना नियतीने घातलेल्या या घावाने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघाताला एक वेदनादायी किनारही आहे. गायकवाड यांना अन्य एका अपघातग्रस्त वाहनाला मदत करण्यासाठी घटनास्थळी जाण्याचा फोन आला होता. मदतीच्या हाकेला प्रतिसाद देत ते सहकाऱ्यासह त्या दिशेने रवाना झाले; मात्र मदतीसाठी निघालेल्या त्यांच्या प्रवासाचा शेवटच काळाने केला. कर्तव्यनिष्ठेची ही धाव त्यांच्या आयुष्यातील अखेरची ठरली.
संतोष गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी नेहमीच खंबीर पाठबळ दिले. मुलाने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले, तर मुलीने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते. मुलीला हॉटेल व्यवसायाची विशेष आवड असल्याने तिच्या या आवडीला व्यावसायिक रूप देण्याचा गायकवाड यांचा मानस होता. तिला स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू करून द्यावा, यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू होते. लेकीच्या स्वप्नांना बळ देत तिचे भविष्य घडविण्याची त्यांची धडपड सुरू असतानाच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. मुलीला व्यवसायात उभे करण्याचे आणि तिच्या स्वप्नांना आकार देण्याचे त्यांचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.
गायकवाड यांनी १९९५-९६ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस दलातील सेवेला सुरुवात केली होती. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांच्या पोलीस सेवेची ३० वर्षे पूर्ण होणार होती. सेवाकाळातील अनुभव, कामातील सातत्य आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर येत्या दोन-तीन वर्षांत त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळण्याचीही शक्यता होती. मात्र, सेवेत तीन दशकांचा टप्पा गाठण्यापूर्वीच त्यांची कारकीर्द अपघाताने संपुष्टात आली. गायकवाड यांचे वडीलही पोलीस खात्यात कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारपणाने त्रस्त आहेत.
गायकवाड कुटुंबाचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे. धरणामुळे पाचांबे परिसरातील काही गावकऱ्यांचे सावर्डेजवळील नायशी येथे पुनर्वसन झाले होते. संतोष गायकवाड हे रत्नागिरीजवळील खेडशी येथे स्थायिक झाले होते. मनमिळाऊ, प्रेमळ आणि मदतीला सदैव तत्पर असलेला स्वभाव ही त्यांची खरी ओळख होती. मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांमध्ये ते विशेष लोकप्रिय होते. कामाच्या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेणारा आणि आपुलकीने माणसे जोडणारा सहकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.
घराचा भक्कम आधार, मुलांच्या भविष्याची स्वप्ने पाहणारा पिता आणि सहकाऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा पोलीस अधिकारी, अशा अनेक भूमिका संतोष गायकवाड समर्थपणे पार पाडत होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि पोलीस दलातील सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. रविवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लेकीच्या स्वप्नांना पंख देण्याची आस मनात ठेवून जगणाऱ्या या पित्याची स्वप्ने मात्र आता आठवणींतच उरली आहेत.


