( संगमेश्वर / प्रतिनिधी )
“माझे पहिले गुरू म्हणजे माझे आई-वडीलच आहेत. त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे आणि गुरूंनी दिलेल्या तबला वादनाच्या विद्येमुळेच मी आज या टप्प्यावर पोहोचू शकलो ,” असे भावनिक उद्गार स्वरूप संगीत विद्यालयाचे संस्थापक व प्रसिद्ध तबलावादक पं. गिरीधर कुलकर्णी यांनी काढले.
देवरुख येथील स्वरूप संगीत विद्यालयातर्फे ‘गुरुवंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पं. गिरीधर कुलकर्णी यांचे शिष्य व संगीत प्रेमींनी आपल्या कलाविष्कारातून गुरूंना मानवंदना अर्पण केली.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंचे पाद्यपूजन करून त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेतला. पं. कुलकर्णी यांचे आई-वडीलही या वेळी उपस्थित होते. “त्यांच्याच आशीर्वाद आणि भक्कम पाठिंब्यामुळे मी इथवर पोहोचू शकलो,” असे सांगून त्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यानंतर झालेल्या तबला वादन सादरीकरणात शिष्यांनी एकताल, झपताल आणि रूपकताल यांचा सुरेख आविष्कार केला. यास लहरासाथ संवादिनीवर अमोघ पेंढारकर यांनी दिली.कार्यक्रमात कोल्हापूर येथील युवा संवादिनी वादक स्वरूप दिवाण यांनी एकल संवादिनी वादन सादर केले. पं. प्रमोद मराठे यांचे शिष्य असलेल्या दिवाण यांनी यमन रागात विलंबित व द्रुत लयीत दोन बंदिशी सादर करत रसिकांची मनं जिंकली. त्यांना ओंकार ब्रीद यांनी तबल्यावर साथ केली.
त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं. विनोद डिग्रजकर यांच्या भावपूर्ण गायनाने वातावरण भारावून गेले. त्यांनी मधुवंती रागात दोन बंदिशी सादर केल्यानंतर परमेश्वरी या थोड्याशा अनवट रागात “वागेश्वरी परमेश्वरी” ही मध्यलयीतील बंदिश सादर केली. यानंतर “कट्यार काळजात घुसली” या नाटकातील “घेई छंद” आणि “पंढरीत” या संत भावातील अभंगाने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. त्यांच्या गायनाला तबल्यावर पं. गिरीधर कुलकर्णी आणि संवादिनीवर स्वरूप दिवाण यांनी साथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरविंद कुलकर्णी आणि प्रा. संदीप मुळये यांनी केले. या वेळी चित्रकार विक्रम परांजपे, हार्मोनियम वादक हेरंब जोगळेकर, अभिरुची संस्थेचे आशीष प्रभूदेसाई आणि देवरुख येथील संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

