(राजापूर / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्हा न्यायालयापाठोपाठ राजापूर येथील दिवाणी व कनिष्ठ स्तर न्यायालयालाही ई-मेलद्वारे बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने राजापूरमध्ये खळबळ उडाली आहे. धमकीची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण न्यायालयीन इमारत रिकामी केली. न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच विविध कामांसाठी आलेल्या पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर राजापूर न्यायालयालाही अशाच स्वरूपाचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने न्यायालय परिसरात धाव घेत सुरक्षा व्यवस्था ताब्यात घेतली. संभाव्य धोका लक्षात घेऊन न्यायालयातील सर्वांना बाहेर काढण्याची कार्यवाही करण्यात आली.
त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या पथकाकडून न्यायालयाच्या संपूर्ण इमारतीची कसून तपासणी सुरू करण्यात आली. इमारतीतील प्रत्येक खोली, कोपरा आणि परिसराची पाहणी केली जात असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
या प्रकारामुळे राजापूर न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांचीही परिसरात गर्दी झाली होती. राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
प्राथमिक माहितीनुसार, राज्यातील अन्य काही न्यायालयांनाही अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांनी अधिक सतर्कता बाळगली आहे.
दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कोठून पाठवण्यात आला, त्यामागील कारण काय आणि या प्रकारात कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. न्यायालयाच्या इमारतीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


