(दापोली /रत्नागिरी)
म्हशी चारण्यासाठी जंगलात गेलेले ६५ वर्षीय गुराखी सायंकाळी उशिरापर्यंत परतले नाहीत. त्यामुळे मालकाने त्यांचा शोध सुरू केला. जंगलात म्हशी आढळल्या; मात्र गुराखीचा मागमूस लागत नव्हता. अखेर मालक आणि त्याच्या मुलाने शोधमोहीम सुरू ठेवली असता रात्री साडेनऊच्या सुमारास काटलीचा पऱ्या येथील पाण्यात ते उपड्या स्थितीत आढळले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. हरि विठ्ठल काते (वय ६५, सध्या रा. माटवण, मूळ गाव पालगड गवळवाडी, ता. दापोली) असे मृत गुराख्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काते हे अनिल श्रीराम महाडिक यांच्याकडे म्हशी सांभाळण्याचे काम करीत होते. दरवर्षी जुलै ते डिसेंबर या कालावधीत ते या कामासाठी येत असत. त्यांचा नियमित दिनक्रम ठरलेला होता. सकाळी ८ वाजता म्हशी चरण्यासाठी घेऊन जाणे आणि दुपारी १२ वाजता परत आणणे, तसेच दुपारी ३.३० वाजता पुन्हा म्हशी घेऊन जाणे आणि सायंकाळी ६ वाजता परत येणे, असा त्यांचा नित्यक्रम होता. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ते म्हशींना घेऊन माटवण रोडलगतच्या जंगलात चरण्यासाठी गेले होते. मात्र, सायंकाळी ६ वाजूनही ते परत न आल्याने महाडिक यांनी त्यांची वाट पाहिली आणि नंतर शोध घेण्यासाठी जंगल गाठले. तेथे म्हशी दिसल्या; मात्र काते दिसून आले नाहीत. महाडिक यांनी ‘मामा, मामा’ अशी हाक मारूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ते म्हशींना घेऊन वाड्यात परतले आणि त्यांना बांधून काते यांच्या घरी शोध घेण्यासाठी गेले. मात्र, तेथेही काते आढळले नाहीत.
यानंतर महाडिक आणि त्यांचा मुलगा सोहम यांनी म्हशी पाणी पिण्यासाठी जात असलेल्या ठिकाणी शोध सुरू केला. या शोधादरम्यान रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास काटलीचा पऱ्या येथे काते पाण्यात उपड्या स्थितीत पडलेले आढळले. त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अपमृत्यू क्रमांक ८२/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू आहे.


