(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील परटवली येथून करक-कारवली रिंग रोडमार्गे अनुस्कुरा तपासणी नाका चुकवत कोल्हापूरच्या दिशेने पाच गोवंश जनावरांची वाहतूक करणारा एमएच-०९-जीजे-५२८२ क्रमांकाचा टेम्पो ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पहाटे पकडण्यात आला. पाचल व परिसरातील तरुणांनी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास संशयित टेम्पोचा पाठलाग करून तो अडवला आणि रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या ताब्यात दिला. घटनेची माहिती पोलिसांना सकाळी सुमारे ५ वाजता देण्यात आल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोच्या पुढे एका चारचाकी वाहनातून कथित एजंट तबरेज चाँदमियाँ ठाकूर हा मार्गदर्शन करत असल्याचा आरोप आहे. मात्र, पाठलागादरम्यान तो चारचाकीसह पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोमध्ये बैलांना अत्यंत अमानुष पद्धतीने बांधण्यात आले होते. आणखी काही काळ त्याच अवस्थेत राहिले असते तर त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असता, असा दावा स्थानिकांनी केला आहे.
पहाटेच्या वेळी करक-कारवली रिंग रोडवर वाहतूक अत्यल्प असल्याने संशयास्पद वाहनाचा आवाज ग्रामस्थांच्या कानावर पडला. त्यानंतर एकमेकांना संपर्क करून परिसरातील तरुणांनी एकत्रितपणे टेम्पोचा पाठलाग केला आणि तो पकडण्यात यश मिळवले. मात्र, पुढे असलेल्या चारचाकी वाहनातील संशयित पसार झाला.
या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र शंकर कदम (वय ३६, रा. हिरवडे दुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर), प्रविण आनंदा खोत (वय ३३, रा. केकटवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर), अल्पाईश नूरमहंमद कलोट (वय २३, रा. सौदळ मुस्लिमवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी), अकान नूरमहंमद कलोट (वय २०, रा. सौदळ मुस्लिमवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) तसेच तबरेज चाँदमियाँ ठाकूर (रा. परटवली, ता. राजापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपी पाच गोवंश जनावरे महिंद्रा व्हिरो कंपनीच्या एमएच-०९-जीजे-५२८२ क्रमांकाच्या टेम्पोमधून ओणी-पाचल मार्गे अनुस्कुरा घाटातून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करत असताना पांगरी खुर्द गावाच्या हद्दीत आढळून आले.
या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, १९६० मधील कलम ११(१), ११(३)(क), ११(१)(ड), प्राण्यांचे परिवहन नियम, १९७८ मधील नियम ४७, ४८, ४९, ५०, ५१, ५४ व ५६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १९९, मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ६६/१९२ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व त्यांच्या पथकाकडून करण्यात येत आहे.

