(रत्नागिरी /प्रतिनिधी)
आठवडा बाजार परिसरातील संगिता लॉजच्या पार्किंगमध्ये उभी असलेली फोर्स कंपनीची क्रुझर गाडी पेटवून दिल्याच्या घटनेमागील कारण अखेर समोर आले आहे. पत्नीशी सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी फिर्यादी आल्याचा राग मनात धरून ही आग लावण्यात आल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकाश चंद्रकांत खेत्री (रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अशोक नाराप्पा गोटेकर (२७, व्यवसाय—चालक, रा. चिंचणी, ता. कडेगाव, जि. सांगली) हे एका कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील फोर्स कंपनीची क्रुझर मॉडेलची चारचाकी (एमएच १० बीएन ७१५२) आठवडा बाजार येथील संगिता लॉजच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १७ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपी आकाश खेत्री याने हातातील कोणत्यातरी वस्तूने क्रुझरच्या पुढील तसेच बाजूच्या काचा फोडल्या. त्यानंतर वाहनामध्ये ज्वलनशील पदार्थ व अन्य वस्तू टाकून वाहनाला आग लावल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या घटनेत वाहनाचे नुकसान झाले.
या घटनेमागे फिर्यादीने आरोपी आणि त्याच्या पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी केलेल्या मध्यस्थीचा राग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन जाळण्याच्या घटनेला केवळ पार्किंगमधील आग न मानता त्यामागे कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी असल्याचे पोलिस तक्रारीतून समोर आले आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील कलम ३२६(f) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


