(चिपळूण/ रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावर बहादूरशेख नाक्याजवळ भरधाव बोलेरो पिकअपने पुढे जाणाऱ्या मारुती सुझुकी डिझायरला मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात डिझायरचे नुकसान झाले असून, याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन अनंत भोजने (वय ४५, व्यवसाय नोकरी, रा. भोम गवळवाडी, ता. चिपळूण; सध्या नवी मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ मे २०२६ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास सचिन भोजने हे त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी डिझायर (क्र. एमएच ४३ एआर ५०३४) मधून आंबडस गवळवाडी येथून खेडी, चिपळूणच्या दिशेने जात होते. बहादूरशेख नाक्याच्या अलीकडे, कोकणदीप मेडिकलसमोर त्यांची कार आली असता, मागून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एमएच १२ एक्सएम ४२७४) च्या चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वाहन भरधाव वेगाने चालविल्याचा आरोप आहे. गोव्याच्या दिशेने जात असताना पिकअपने डिझायरच्या मागील उजव्या बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेत डिझायरच्या मागील भागाचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचे नोंद नाही.
या प्रकरणी अमोल सुनील लोले (वय २६, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्याविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप अटक करण्यात आलेली नसून, घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलिसांकडून सुरू आहे.


