(चिपळूण)
वैद्यकीय क्षेत्रात पदार्पणाची पहिली पायरी मानल्या जाणाऱ्या NEET-UG 2025 परीक्षेत चिपळूणच्या अरिबा मुबीन राजिवटे हिने 91 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे चिपळूण शहरासह संपूर्ण कोकणात आनंदाची आणि अभिमानाची लहर उमटली आहे.
अरिबा ही खेड येथील रोटरी कॉलेजची विद्यार्थीनी असून ती नेहमीच अभ्यासात पुढे राहिली आहे. दहावीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेतही तिने 93 टक्के गुण मिळवत आपल्या शैक्षणिक क्षमतेची ठसठशीत छाप पाडली होती. अभ्यासातील एकाग्रता, चिकाटी आणि सातत्य हेच तिच्या यशामागचे सूत्र राहिले आहे. कुटुंबियांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अथक मेहनत या त्रिसूत्रीमुळेच तिला हे घवघवीत यश मिळवता आले, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे अरिबा ही साहित्य व रंगभूमी क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यानुरागी महंमद झारे यांची नात असून, त्यांच्या सांस्कृतिक वारशाला पुढे नेत आत्मविश्वासाने आपली वाटचाल करत आहे. अरिबाच्या या उज्वल यशाबद्दल जिल्हाभरातून आणि शैक्षणिक वर्तुळातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेक संस्थांकडून गौरव केला जात आहे.