(चिपळूण / प्रतिनिधी)
गोवळकोट रोड परिसरातील अल नजू अपार्टमेंटमधील भरदिवसा झालेल्या घरफोडीची घटना अद्याप ताजी असतानाच चिपळूण शहरालगतच्या कळमुंडी येथील हनुमानवाडी परिसरात आणखी एका घरफोडीने खळबळ उडाली आहे. एका हॉटेल व्यावसायिकाच्या घरातून ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा सोन्याचे दागिने व रोख रकमेचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी घरातील मोलकरणीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरात घडलेल्या सलग तिसऱ्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी संतोष सुयोग बेलवलकर (वय ३०, रा. कळमुंडी-हनुमानवाडी) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजी पहाटे ५ ते १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०४ या कालावधीत ही चोरी झाली. अज्ञात व्यक्तीने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केला. चोरीस गेलेल्या ऐवजात मंगळसूत्र, कानातील कुड्यांची जोडी, सोन्याची चेन, पेंडंट, ब्रेसलेट, टॉप्स, नथ, दोन सोन्याची नाणी, दोन अंगठ्या, गोल मणी तसेच १८ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे.
या प्रकरणी दीपिका दिलीप बोबले (वय ४०, रा. आवेरीवाडी, कळमुंडी) आणि गणेश काशिराम गोरीवले (वय ३१, रा. कळमुंडी) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.
एक घरफोडीचा तपास सुरू, तोवर दुसरी घटना
दोन दिवसांपूर्वी गोवळकोट रोड येथील अल नजू अपार्टमेंटमधून ८ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याच्या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दुसरी मोठी घरफोडी समोर आल्याने चिपळूण शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. सलग घडणाऱ्या घरफोड्यांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही चर्चा सुरू झाली असून, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करून रात्रीच्या गस्तीसह प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

