(चिपळूण/ प्रतिनिधी)
सावर्डे येथील जुन्या वादाचे कारण मनात धरून बिअरबारमध्ये चालकावर काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सावर्डे येथे घडली असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप शिवराम जाधव (वय ४९, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मरीआई मंदिर शेजारी, सावर्डे) हे २३ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सावर्डे येथील हॉटेल गुडलक बियर बार अँड परमिट रूम येथे बिअर पार्सल घेण्यासाठी गेले होते. यावेळी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून संशयित आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दोन महिन्यांपूर्वी जाधव हे याच बिअरबारमध्ये गेले असता हिशोब बंद झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या आरोपी क्रमांक २ यांनी “तुला दारू मिळणार नाही” असे म्हणत वाद घातला होता. त्याच वादातून २३ मार्च रोजी पुन्हा आरोपी क्रमांक १ व २ यांनी जाधव यांना काउंटरजवळ उभे पाहून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी क्रमांक ३ यांनी जाधव यांना पकडून ठेवले, तर आरोपी क्रमांक १ व २ यांनी काठी, हाताचे ठोसे, लाथाबुक्क्यांनी डोके, पाठ, मान, डावा डोळा, कानाखाली, पोट, बरगड्या व छातीवर मारहाण केली.
या मारहाणी दरम्यान जाधव यांना खाली पाडून त्यांच्या पायातील बूट काढून डोक्यावर व कानाखाली मारण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या झटापटीत त्यांचा डोळ्यावरील चष्मा, दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे ब्रेसलेट, गळ्यातील रुद्राक्षाची माळ तसेच ब्ल्यूटूथचे नुकसान झाले. या घटनेनंतर संशयित आरोपी क्रमांक २ व ३ यांनी जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली तसेच धमकी देत जाधव यांना पुन्हा थपडा मारल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी उभयचंद आत्माराम मोहिरे, प्रितेश आत्माराम मोहिरे आणि रेखा आत्माराम मोहिरे (सर्व रा. सावर्डे, ता. चिपळूण) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

