(चिपळूण)
उत्तर प्रदेशातील मोदीनगर (गाझियाबाद) येथे ८ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग लीग अजिंक्यपद स्पर्धेत कोकणच्या लेकीने घवघवीत यश मिळवत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. चिपळूणच्या कु. हर्षिणी जागृती प्रशांत चव्हाण हिने युथ गटात (१७ वर्षांखालील) ४८ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावत राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवली.
या स्पर्धेत हर्षिणीने स्नॅच प्रकारात ६२ किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात ८० किलो वजन यशस्वीरीत्या उचलून एकूण १४२ किलो अशी उल्लेखनीय कामगिरी केली आणि प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या दमदार प्रदर्शनामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राष्ट्रीय स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळा भारताची आंतरराष्ट्रीय कीर्तीची वेटलिफ्टर व पद्मश्री पुरस्कार विजेती मिराबाई चानू यांच्या शुभहस्ते पार पडला. त्यांच्या हस्ते सुवर्ण पदक स्वीकारताना हर्षिणीचा आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाचे यश स्पष्टपणे दिसून आले.
हर्षिणीच्या या यशामागे तिचे प्रशिक्षक श्री. सुनील दळवी (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) आणि श्री. समीर सावंत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनामुळेच हर्षिणी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी ठरली, असे क्रीडावर्तुळातून सांगितले जात आहे.
हर्षिणी चव्हाण हिच्या या सुवर्णयशाबद्दल राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

