(सावर्डे / चिपळूण)
सह्याद्री क्रीडा संकुल, सावर्डे येथील ऐतिहासिक क्रीडांगणावर श्री देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ‘कोष्टी समाज प्रीमिअर लीग २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच होत असलेली ही स्पर्धा शनिवार, २८ फेब्रुवारी आणि रविवार, १ मार्च २०२६ रोजी रंगणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार असून, उद्घाटन चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शेखरजी निकम यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून श्री. चंद्रकांत धोंडू बाईत (माजी अध्यक्ष, श्री देवांग कोष्टी समाज, महाराष्ट्र), श्री. सचिन सुभाष पाकळे (उद्योजक), श्री. विजय काशिनाथ तेटांबे (उद्योजक) तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत पालगड, दहागाव (मंडणगड), दापोली, खेड, गिमव्ही, आबलोली (गुहागर), पेढे, सावर्डे, दहिवली, आगवे, मांडकी, पालवण, निवळी (चिपळूण), आंबव, तुरळ (संगमेश्वर), खरवते, जुवाठी (राजापूर) आदी गावांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. एकूण १२ नामवंत संघ स्पर्धेत सहभागी होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. गजानन गणपत लोकरे आणि सचिव श्री. अरविंद रामचंद्र भंडारी यांनी दिली.
स्पर्धेची प्रवेश फी ३,००० रुपये आहे. विजेत्या संघाला ३३,३३३ रुपये रोख व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला २२,२२२ रुपये रोख व चषक, तृतीय क्रमांकाला ११,१११ रुपये रोख व चषक, तर चतुर्थ क्रमांकाला ७,७७७ रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. यासोबतच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर आदी वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत. सर्व खेळाडूंना टी-शर्ट तसेच चहा–नाष्टा आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सामने मर्यादित षटकांचे असतील.
आयोजकांचे आवाहन
समाजातील तरुणांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणणे आणि त्यांच्या क्रीडा कौशल्यांना व्यासपीठ मिळवून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या आयोजनासाठी अध्यक्ष श्री. गजानन गणपत लोकरे, कार्याध्यक्ष श्री. सचिन चंद्रकांत बाईत, सचिव श्री. अरविंद रामचंद्र भंडारी, खजिनदार श्री. दिपक शाहू रेपाळ, सहसचिव श्री. दिनेश परशुराम नेटके यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य, सल्लागार आणि क्रीडा समिती सदस्य परिश्रम घेत आहेत.
कोष्टी समाजातील सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

