(चिपळूण / रत्नागिरी)
कोकण रेल्वेतील ऑफिस बॉय, खलाशी आणि हेल्पर पदांसाठी १४ सप्टेंबर रोजी झालेल्या खुल्या मुलाखतीतून ३२ बेरोजगार उमेदवारांची निवड झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, निवड झालेल्या उमेदवारांची केवळ नावे प्रसिद्ध करून त्यांच्या नावासमोर गाव, तालुका आणि जिल्ह्याचा पत्ता देण्यात आलेला नसल्याने भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निवड झालेले उमेदवार नेमके कोकणातील आहेत की बाहेरील, हे कळू नये अशीच व्यवस्था का?, असा सवाल कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने उपस्थित केला आहे.
प्रशासनाने निवड झालेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती सार्वजनिक न केल्यामुळे या भरती प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाल्याचा दावा समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केला आहे. उमेदवारांची नावे जाहीर करणे पुरेसे नसून त्यांचा गाव, तालुका आणि जिल्हा यांसह संपूर्ण पत्ता जाहीर केल्यास निवडीची वस्तुस्थिती नागरिकांसमोर स्पष्ट होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही अशाच स्वरूपात २५ उमेदवारांची भरती करण्यात आली होती. त्यामुळे सध्याच्या ३२ आणि यापूर्वी निवड झालेल्या २५ अशा सर्व ५७ उमेदवारांची नावे व संपूर्ण पत्ता सार्वजनिक करण्याची मागणी समितीने केली आहे. भरती प्रक्रिया खुली आणि पारदर्शक असेल, तर उमेदवारांची मूलभूत माहिती जाहीर करण्यात प्रशासनाला अडचण काय, असा थेट सवालही समितीने केला आहे.
कोकण रेल्वे प्रकल्पासाठी कोकणातील जनतेने जमीन, घरे आणि उपजीविकेच्या साधनांचा त्याग केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावे, ही अपेक्षा रास्त असल्याचे मुकादम यांनी म्हटले आहे. कोकणाच्या विकासाच्या नावाखाली प्रकल्प उभा राहिला; मात्र रोजगाराच्या वेळी कोकणातील तरुणच बाहेर उभा राहणार असेल, तर या विकासाचा नेमका लाभ कोणाला?, असा सवाल त्यांनी केला.
स्थानिक उमेदवारांना डावलून बाहेरील उमेदवारांची निवड झाल्याचे पुराव्यांनिशी समोर आल्यास समिती शांत बसणार नाही, असा इशाराही मुकादम यांनी दिला. भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाहीर करून प्रशासनाने निर्माण झालेला संभ्रम दूर करावा; अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांच्या पत्त्याची माहिती सार्वजनिक न करण्यामागील प्रशासनाची भूमिका काय, तसेच स्थानिक उमेदवारांना या भरतीत किती संधी मिळाली, याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित आहे.


