(संगमेश्वर / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डेहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला मागून भरधाव आलेल्या इर्टिगा कारने जोरदार धडक दिल्याची घटना पैसाफंड हायस्कूलसमोरील पुलावर घडली. या अपघातात रिक्षाचालकाला किरकोळ दुखापत झाली असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपिल प्रकाश शिरसेकर (वय ४१, व्यवसाय रिक्षाचालक, रा. कोकणनगर, रत्नागिरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४.२० वाजता कपिल शिरसेकर हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा क्रमांक एमएच ०८ बीसी ०७०७ मधून प्रवासी घेऊन सावर्डेहून रत्नागिरीच्या दिशेने मुंबई-गोवा महामार्गावरून जात होते. पैसाफंड हायस्कूलसमोरील पुलावर रिक्षा आली असता, मागून येणाऱ्या इर्टिगा कार क्रमांक एमएच ४७ ए.वाय. १६३४ च्या चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वाहन अतिवेगाने चालविल्याचा आरोप आहे. या कारने रिक्षाच्या मागील उजव्या बाजूस जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहनांचा अपघात झाला. धडकेमध्ये रिक्षाचालक कपिल शिरसेकर यांना किरकोळ दुखापत झाली. तसेच रिक्षा आणि इर्टिगा कारचे नुकसान झाले.
या प्रकरणी राम प्रकाश लाल (वय ४०, व्यवसाय चालक, रा. बोरीवली पश्चिम, लिंक रोड, गणपत पाटीलनगर, मुंबई; मूळ उत्तर प्रदेश) यांच्याविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, अपघाताचा पुढील तपास संगमेश्वर पोलिसांकडून सुरू आहे.


