(रत्नागिरी / वार्ताहर)
शहरातील शिवाजी स्टेडियम येथे बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. उमेश मंगेश खानविलकर (वय ५१, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २.०० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातून उमेश खानविलकर हे शिवाजी स्टेडियम येथे पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती त्यांच्या भावाला देण्यात आली. माहिती मिळताच त्यांचे भाऊ अमित मंगेश खानविलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अमित यांना उमेश हे स्टेडियममध्ये बेशुद्धावस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी उमेश यांना उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अमित खानविलकर यांनी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने उमेश यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता उमेश खानविलकर यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. उमेश खानविलकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


