(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे जागतिक क्षयरोग दिन उत्साहपूर्ण वातावरणात विविध जनजागृती उपक्रमांनी साजरा करण्यात आला. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने ठोस पाऊल म्हणून जिल्ह्यात “टीबी हद्दपार” करण्यासाठी १०० दिवसांचे विशेष अभियान सुरू करण्यात आले असून, सक्रिय रुग्ण शोध, वेळेवर निदान, संपूर्ण उपचार आणि व्यापक जनजागृती यावर या मोहिमेत विशेष भर दिला जाणार आहे.
कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्यासह आरोग्य विभागातील विविध अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. महेंद्र गावडे यांनी नागरिकांना क्षयरोगाबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला टिकून राहिल्यास विलंब न करता त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे. क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो; मात्र उपचार नियमित आणि संपूर्ण कालावधीपर्यंत घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
क्षयरोग हा हवेतून पसरणारा संसर्गजन्य आजार असून तो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, मात्र इतर अवयवांनाही बाधित करू शकतो. दीर्घकाळ खोकला, ताप, रात्री घाम येणे, वजन घटणे, भूक मंदावणे, अशक्तपणा आणि थुंकीतून रक्त पडणे ही त्याची प्रमुख लक्षणे मानली जातात. शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी व औषधोपचार मोफत उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
“टीबी मुक्त ग्रामपंचायत” उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रतिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत २८४ ग्रामपंचायती टीबीमुक्त झाल्या असून दापोली, चिपळूण, खेड आणि संगमेश्वर तालुक्यांनी उल्लेखनीय प्रगती नोंदविली आहे. जिल्ह्यात सध्या १३९० क्षयरोग रुग्ण उपचाराखाली असून, २०२५ या वर्षात १९८९ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कार्यक्रमाच्या शेवटी नर्सिंग विद्यार्थ्यांसह आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातून जनजागृती रॅली काढून नागरिकांपर्यंत “लवकर निदान, नियमित उपचार आणि जनजागृतीमुळेच क्षयरोगावर मात शक्य” हा संदेश पोहोचविला.

