(रत्नागिरी)
रत्नागिरीतील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी कुटुंबासोबत आलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगवतीनगर, निवेंडी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुंबईतील दहिसर परिसरात राहणारी स्वरा स्वप्नेश जाधव (वय ३) ही आपल्या आई-वडिलांसह आणि नातेवाईकांसोबत रत्नागिरी पर्यटनासाठी निवेंडी येथे आली होती. ३ जून रोजी सायंकाळी ती इतर लहान मुलांसोबत घराच्या अंगणात खेळत होती. तिच्या निरागस हसण्याने परिसर आनंदाने भरून गेला होता. मात्र काही क्षणांतच आनंदाचे वातावरण शोकांतिकेत बदलले.
काही वेळानंतर आई श्वेता जाधव यांचे लक्ष गेले असता स्वरा परिसरात दिसत नव्हती. मुलगी अचानक नजरेआड झाल्याने कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली. नातेवाईक आणि स्थानिकांनी परिसरात तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, स्वराच्या नातेवाईकांनी घराजवळील विहिरीत पाहिले असता स्वरा पाण्यात तरंगताना दिसली. हे दृश्य पाहताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि परिसरात एकच आक्रोश झाला.
स्थानिकांच्या मदतीने तातडीने स्वराला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तिच्यावर तत्काळ सीपीआर करण्यात आला. त्यानंतर तिला मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
काही वेळापूर्वी ज्या अंगणात स्वराच्या खेळण्याचा आणि हसण्याचा आवाज घुमत होता, त्याच ठिकाणी तिच्या आईचा आक्रोश आणि नातेवाईकांचा हंबरडा होता. देवदर्शन आणि सहलीसाठी आलेल्या कुटुंबाच्या आयुष्यात एका क्षणात दुःखाची काळी छाया पसरली.
या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. चिमुरडी स्वराच्या निधनाने संपूर्ण परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

