(रत्नागिरी / प्रतिनिधी)
काही महिन्यांपूर्वी वयोमानानुसार निवृत्त झालेले डॉ. अजित पवार यांनी दिनांक 12 जून 2025 (गुरुवारी) दुपारच्या सुमारास रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत थेट महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करत त्यांनी डीन, डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाणीच्या धमक्या दिल्याचा आरोप आहे.
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास डॉक्टर पवार हे महाविद्यालयात दारूच्या नशेत दाखल झाल्याचे बोलले जात आहे आणि त्यांनी डीनसह डॉक्टर मनोहर कदम, कार्यकारी अधिकारी तुषार पावसकर यांच्याशी आरडाओरडा करून वाद घालण्यास सुरुवात केली. “काम करू देणार नाही”, “पदावरून काढून टाकीन”, “प्रमोशन थांबवीन” अशा स्वरूपाच्याही धमक्या दिल्याचे सांगण्यात आले आहे. ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील डॉ. अजित पवार यांच्यावर हॉस्पिटलमध्ये दारूच्या नशेत येणे, रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर हुज्जत घालणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी उद्धटपणे वागणे यांसारख्या गंभीर आरोपांमुळे रुग्णालयामधून कार्यभार काढून घेण्यात आल्याचे समजते. अशा व्यक्तीकडून सतत निर्माण होणाऱ्या अशांततेमुळे वैद्यकीय महाविद्यालयातील शिस्त आणि कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
घडलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी पोलिस प्रशासनाला पत्र लिहून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक आमदारांनीही या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. डॉक्टर अजित पवार यांच्या वादग्रस्त वागणुकीने इतर इंटर्न डॉक्टर व प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
“शासन जर गप्प राहिले तर अशा घटनांना रोखायचं कोणी?”
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये माजी डॉक्टरने दारूच्या नशेत केलेला धुडगूस हा एक सामान्य अनुशासनभंग नाही, तर तो एक गंभीर प्रशासनविरोधी प्रकार आहे. अशा घटनांमुळे सार्वजनिक संस्थांतील शिस्त कोलमडते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, आणि अखेर जनतेचा विश्वास डळमळतो. डॉ. अजित पवार हे रिटायर्ड असले तरी त्यांनी संस्थेच्या आवारात येऊन मारहाणीच्या धमक्या देणे , शिवीगाळ करणे, पदावरून काढण्याचे फुकाचे इशारे देणे. हे कृत्य केवळ अशोभनीय नाही, तर कायद्यानुसार गुन्हा ठरतो.
हा प्रश्न केवळ एका डॉक्टरच्या गैरवर्तनाचा नाही, तर….
शासकीय कागदोपत्री तक्रार दाखल झाल्यावरही जर संबंधित यंत्रणा केवळ ‘चौकशी सुरू आहे’च्या नावाखाली वेळ मारून नेत असतील, तर अशा प्रकारांना रोखणे अशक्य होईल. यासाठीच, पोलिसांनी तत्काळ FIR दाखल करून चौकशीला गती द्यावी, डॉ. अजित पवार यांना सार्वजनिक कार्यालयात प्रवेशबंदी जाहीर करावी, संवेदनशील शासकीय संस्थांमध्ये अशा व्यक्तींच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा सक्रिय करावी. हा प्रश्न केवळ एका डॉक्टरच्या गैरवर्तनाचा नाही, तर प्रशासनाच्या प्रतिष्ठेचा, कायद्याच्या अंमलबजावणीचा आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आहे. आज जर शासन आणि पोलिस प्रशासनाने यावर ठोस पावले उचलली, तरच भविष्यात अशा घटनांना लगाम घालता येईल.