(छ. संभाजीनगर / वृत्तसंस्था)
मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट सातत्याने कायम असून यंदाही पावसाचा मोठा खंड पडल्याने शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. ५ ऑक्टोबरनंतर पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत केली जाईल. तसेच पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मानवंदना देण्यात आली तसेच शहीद स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, खा. संदिपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे, विधानपरिषद सदस्य आ. सतीश चव्हाण, आ. अंबादास दानवे, आ. सुहास शिरसाट, विधानसभा सदस्य आ. रमेश बोरनारे, आ. प्रदीप जयस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. विलास भुमरे, आ. अनुराधा चव्हाण, आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील आदी यावेळी उपस्थित होते.
मराठवाड्याच्या सध्याच्या पिढीने दुष्काळ अनुभवला आहे; मात्र पुढील पिढीला दुष्काळाचा सामना करावा लागू नये, असा संकल्प सरकारने केला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी कृष्णा खोऱ्यातील पाणी भीमा खोऱ्यातून अतिरिक्त ३० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून धाराशिव, बीड आणि लातूरच्या भागापर्यंत पाणी पोहोचवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोदावरी खोरे, उल्हास खोरे आणि कोकणातून पाणी उचलण्याबरोबरच नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी आणण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. उल्हास खोऱ्यातून जवळपास ७० टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणता येईल. या माध्यमातून मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून टप्प्याटप्प्याने ७ वर्षांत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठवाड्याचा यापूर्वी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला असून आता दुष्काळाशी संघर्ष सुरू आहे. यंदाही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत, कोकणातील आणि कृष्णा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणून हा प्रदेश दुष्काळमुक्त करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आतापर्यंत १५ लाखांच्या वर शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला असून जवळपास ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीज बिले रद्द करण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मराठवाड्यात सक्षम आणि जलद दळणवळणाची सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने जालना ड्रायपोर्टचे काम सुरू झाले आहे. मराठवाड्यात तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या आवश्यक आयात-निर्यातीची सुविधा या ड्रायपोर्टच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातही चांगला वाव असल्याचे सांगत त्यासाठी शेंद्रा-बिडकीन आणि बिडकीन-ढोरेगाव हे दोन रस्ते सहा पदरी करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.


