(गणपतीपुळे / वैभव पवार)
मालगुंड येथील आदर्श प्राथमिक शाळा, मालगुंड तळेपाट नंबर २ मध्ये शालेय विद्यार्थ्यांचा वार्षिक विविध गुणदर्शन कार्यक्रम नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार आणि लोकप्रबोधनात्मक सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांची मनापासून वाहवा मिळवली.
या गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य राजेश उर्फ राजू साळवी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या पूर्वा दुर्गवळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळ मालगुंड तळेपाटचे अध्यक्ष नितीन अभ्यंकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी महिला व बालकल्याण सभापती साधना साळवी, शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्वा सावंत, सहशिक्षिका स्वरा चव्हाण, मालगुंड विद्यालयाचे शिक्षक रुपेश तावडे व संगम चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संतोष चौगुळे, सदस्या शिल्पा पवार, शिक्षक सुजित साळवी, रविकांत पवार, दिवाकर पवार, समृद्धी गोणबरे, नीता पवार, अमिता साळवी, पोलीस पाटील अमोल राऊत आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमात शाळा व अंगणवाडीतील बालकलाकारांनी समूहगीते, कोळीगीते, भारुड, पोवाडे, रेकॉर्ड डान्स, लावणी नृत्य, देशभक्तीपर गीते, शेतकरी नृत्य अशा विविध प्रकारच्या लोकप्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या बालकलाकारांना रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख मान्यवरांचा, विशेष प्राविण्य प्राप्त शालेय विद्यार्थ्यांचा तसेच माजी शालेय विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय “गरजू माता” या विशेष सन्मानाने मालगुंड बौद्धवाडी येथील नीता सदानंद पवार यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य राजू साळवी व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या पूर्वा दुर्गवळी यांचा बहुमताने निवडून आल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मालगुंड हायस्कूलचा विद्यार्थी संगम चव्हाण याने राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल आणि त्याला सर्वोत्तम प्रशिक्षण दिल्याबद्दल त्याचे प्रशिक्षक रुपेश तावडे यांचाही शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन पत्रकार वैभव पवार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पालक, ग्रामस्थ बंधू-भगिनी तसेच मालगुंड बौद्धवाडी येथील आम्रपाली कला मंचाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्वा सावंत, शिक्षिका स्वरा चव्हाण, अंगणवाडी सेविका ज्योती पवार व मदतनीस अक्षता पवार यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी मोलाचे सहकार्य केले.
एकूणच, मालगुंड तळेपाट नंबर २ शाळेतील हा वार्षिक गुणदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा, समाजप्रबोधन करणारा आणि सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

